नगरदेवळा येथील सार्वजनिक वापरासाठी असलेल्या आणि ‘सरकारी टाकी’ (२९१ क्रमांक) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विहिरीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसांत या विहिरीत घोरपड आणि कबूतरे पडून त्यांचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत.
यामुळे पाण्याचे प्रदूषण होऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात असून, ग्रामपंचायतीने या विहिरीवर तातडीने लोखंडी जाळी बसवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
नगरदेवळा परिसरात ही विहीर सार्वजनिक वापरासाठी महत्त्वाची मानली जाते. मात्र, विहीर उघडी असल्याने त्यामध्ये पक्षी आणि वन्य प्राणी पडून मृत्युमुखी पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
मेलेले प्राणी पाण्यात कुजल्यामुळे पाण्याचा उग्र दर्प येत असून, हेच पाणी नागरिक वापरासाठी घेत असल्याने आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.ग्रामस्थांचा संताप आणि मागणीविहिरीची ही दुरवस्था पाहून परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. भविष्यात कोणतीही मोठी दुर्घटना घडू नये आणि पाण्याचे शुद्धीकरण टिकून राहावे, यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे.
विहिरीच्या मुखावर मजबूत लोखंडी जाळी (Grill) बसवण्यात यावी, जेणेकरून प्राणी किंवा पक्षी त्यात पडणार नाहीत, अशी मागणी जोर धरत आहे.आता या प्रकरणी ग्रामपंचायत प्रशासन किती लवकर पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.