संपादक हसीबुर शेख ✍️:-
नगरदेवळा दर्पण मराठी लाईव्ह न्युज :-
नगरदेवळा येथील होळ शिवारात निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका एका शेतकऱ्याला बसला आहे. येथील शेतकरी अफजल खान फत्ते खान यांच्या शेतात वादळी वारे आणि जोरदार पावसामुळे केळीच्या बागेचे अतोनात नुकसान झाले आहे ऐन काढणीला आलेल्या केळीच्या बागेचे होत्याचे नव्हते झाल्याने अफजल खान यांच्यावर मोठे संकट ओढवले आहे
गेल्या काही दिवसांपासून परिसरात वातावरणात अचानक बदल होऊन वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. या वादळी वाऱ्यांचा वेग इतका प्रचंड होता की, होळ शिवारातील अफजल खान यांच्या शेतातील केळीची शेकडो झाडे अक्षरश मुळापासून उमळून पडली आहेत. शेतात लागवड केलेली केळीची बाग पूर्णपणे भुईसपाट झाली असून, पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान:-
अफजल खान यांनी आपल्या शेतात मोठ्या मेहनतीने आणि भांडवल लावून केळीची लागवड केली होती. केळीची झाडे काढणीला निस्वाडला आलेली असतानाच ही नैसर्गिक आपत्ती ओढवल्याने अफजल खान यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
प्रशासनाकडे मदतीची अपेक्षा:-
केळीच्या नुकसानीमुळे अफजल खान यांचे मोठे आर्थिक कंबरडे मोडले आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी शेतात धाव घेतली. दरम्यान, महसूल विभागाने आणि कृषी विभागाने त्वरित घटनास्थळी पंचनामा करावा, तसेच झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्याला तातडीने योग्य नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे.